मुंबईतील म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी केंद्रीय मंत्र्यासह आमदारांचेही अर्ज

0


मुंबई : मुंबईत म्हाडाची तब्बल ४ हजार ८२ घरांची सोडत निघाली आहे. या सोडतीत अनेक जणांनी अर्ज केले आहे. दरम्यान, या सोडतीत ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या सोबत काही आमदारांनी देखील अर्ज केला आहे. यात आमदार आमश्या पाडवी, नारायण कुचे यांच्यासह माजी आमदार हिरामण वरखडे यांनी देखील अर्ज भरला आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरे परवडणाऱ्या किमतीत मिळावी या साठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे. यात विविध उत्पन्न गटासाठी घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्ज म्हाडाला प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, या सोडतीत उच्च उत्पन्न गटातील काही घरांची सोडत निघाली आहे. संकेत क्रमांक ४७० मधील उच्च उत्पन्न गटात ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील १४२.३० चौ. मीटर क्षेत्रफळाचे घर असून, या घराची किंमत सात कोटी ५७ लाख ९४ हजार २६७ रुपये आहे. या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी अर्ज केला आहे. या बाबतची माहिती कराड यांनी एक दैनिकाला दिली आहे.

दरम्यान, अनेक आमदारांनी सुद्धा मुंबईत घर घेण्यासाठी या सोडतीत अर्ज केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी देखील सर्वसाधारण गटातून आणि लोकप्रतिनिधी गटातून घर घेण्यासाठी अर्ज केले आहेत. कुचे यांनी एकूण पाच भरले आहेत. त्यांनी क्रीसेंट टॉवरमधील संकेत क्रमांक ४६९ मधील सात कोटी ५२ लाख ६१ हजार ६३१ रुपये किमतीच्या घरासाठी दोन अर्ज तर एक अर्ज याच टॉवरमधील ५ कोटी ९३ लाख रुपये किमतीच्या घरासाठी केला आहे. त्यांच्या सोबत माजी आमदार हिरामण वरखड यांनी तीन अर्ज केले आहे. हे सर्व अर्ज अल्प उत्पन्न गटातील घरासाठी त्यांनी केले आहेत. तर आमदार आमश्या पाडवी यांनी देखील अल्प गटातील घरासाठी अर्ज केला आहे.

म्हाडाद्वारे कमी किमतीच्या घरासाठी सोडत काढण्यात येते. या साठी विविध उत्पन्न गट ठरवण्यात आले आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीसाठी असलेले आरक्षण रद्द करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. म्हाडाने या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. अत्यल्प आणि अल्प गटासाठी लोकप्रतिनिधींचे अर्ज येत नसले तरी यंदाच्या सोडतीतील मध्यम आणि उच्च गटासाठीच्या घरांसाठी लोकप्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)