Kalyan-Dombivli Municipal Corporation Election कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीआधीच डोंबिवलीत दबावतंत्राचा वापर झाल्याचे आरोप होत आहेत. उद्या, २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून, शेवटच्या २४ तासांत काही बाहुबली उमेदवारांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर दबाव टाकल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उमेदवारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २७ मधील मनसेच्या महिला उमेदवाराने, तसेच प्रभाग क्रमांक २४ मधील सर्व मनसे उमेदवारांनी दबावतंत्रामुळे आपले अर्ज माघारी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. तसेच प्रभाग क्रमांक २८ मध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल राजेश मोरे हे प्रभाग २८ (अ) मधून निवडणूक लढवत असून, त्यांच्यासमोर असलेले दोन अपक्ष उमेदवार शशिकांत धोत्रे आणि पंढरीनाथ म्हात्रे यांनी अर्ज माघारी घेतल्याने ते बिनविरोध विजयी ठरले आहेत. याच प्रभागातील २८ (क) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या महिला उमेदवारही कथित दबावामुळे भूमिगत झाल्याचे सांगितले जाते. तर प्रभाग २८ (ड) मधील मनसेचे एकमेव उमेदवार समीर भोर हे दुपारपासून दबावतंत्र तीव्र झाल्याने पक्षाच्या आदेशानुसार भूमिगत झाले असून ते सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी असून, बिनविरोध निवडणुकीमुळे आपला मतदानाचा मूलभूत हक्कच हिरावून घेतला गेल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. मनसेसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. स्थानिक प्रश्नांवरील पकड आणि जनतेतील प्रभावामुळे संबंधित उमेदवाराला चांगला जनाधार मिळत असल्याचे सर्व्हेतून समोर आले होते. त्यामुळे ही लढत सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकली असती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे डोंबिवलीतील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
