रायगड : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशांसाठीचा तगादा लावल्यानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याचे नयना यांचे म्हणणे आहे. या तक्रारीची दखल घेऊन खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी लेखी तक्रार दिली आहे. 'ECL फायनांन्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे', असे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पाचजणांविरुद्ध गुन्हा झाला दाखल
या तक्रारीवरून खालापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २६९/२०२३ भादवि ३०६, ३४ अन्वये वरील ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी व इतर अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर विभाग करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडून देण्यात आली.
