
जगासह भारतानेही डिजिटल युगाकडे वाटचाल सुरु केली आहे. मात्र, डिजिटल व्यवहार आणि कार्यपद्धतीसह सायबर गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल ८० कोटीहून अधिक भारतीयांची खाजगी माहिती चोरीला गेल्याची माहिती समोर आली. अमेरिकन फर्मने ८१.५ कोटी भारतीयांची आधार आणि पासपोर्ट संबंधित माहिती चोरीला गेली असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हेतर ही माहिती ऑनलाईन विकण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगितले गेले आहे.
@MrRajputHacker नावाच्या ट्विटर हँडलवरून सोमवारी (३० ऑक्टोंबर) एक पोस्ट करण्यात आली. ज्यात त्याने अज्ञात हॅकर्सनी कोरोना काळातील ८० कोटी भारतीयांची खाजगी माहिती चोरी झाल्याची माहिती दिली.लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वय या माहितीचा समावेश आहे. लीक झालेला डेटा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडील असू शकतो. आयसीएमआरकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे.
ऑगस्ट महिन्यात भारतीयांची खाजगी माहिती विकण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यापूर्वी जून महिन्यात कोरोना लस घेतलेल्या नागरिकांची खाजगी माहिती चोरीला गेली होती. यानंतर सरकारने पुढील तपासाला सुरुवात केली होती. ऑनलाइनचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगार फसवणुकीचे दररोज वेगवेगळे फंडे शोधू लागले आहेत. मेसेज, कॉल, लिंक पाठवून त्या लोकांना कमी दिवसांत जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात आहे.
एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षात सायबर गुन्हेगारांनी जवळपास २ लाख लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. या काळात सायबर गुन्हेगारांनी नागरिकांकडून तब्बल ७०० कोटी हून अधिक रक्कम लुबाडली आहे. तर, ३०० कोटींची रक्कम अद्याप मिळाली नाही. विशेष म्हणजे, ३९ टक्के लोकांनी फसवणूक झाल्यानंतरही पोलिसांत तक्रार दिली नाही.
सायबर गुन्हेगारी ‘अशी’ टाळावी
- अर्जंट किंवा तत्काळ अशा स्वरूपात मेसेज किंवा लिंक आल्यास त्याची खात्री करावी.
- कोणाच्या सांगण्यावरून मोबाईलद्वारे केवायसी करू नये.
- कोणत्याही व्यक्तीला ओटीपी सांगू नये, तसेच बँक आणि एटीएमचा पिन वारंवार बदलत राहावे.
- सवलत, कमी दिवसांत जास्त पैसे मिळतील, ॲवॉर्ड भेटलाय, नोकरी लागली अशा गोष्टींना बळी पडू नका.
- जुन्या गाड्या किंवा वस्तू स्वस्तात भेटतील, यावर फारसा विश्वास ठेवू नका.
फसवणूक झाल्यास येथे तक्रार करा
ऑनलाइन फसवणूक झाल्यावर cybercrime.gove.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी, ज्यामुळे तुमचे बँक खाते गोठवता येईल. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यातही याबाबत माहिती द्यावी, जेणेकरून संबंधितावर कारवाई करणे सोयीचे होईल.
