
मुंबई : मुंबई पोलीस दलात ११ महिन्यांसाठी कंत्राटी पोलिस भरती करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मंजूरी दिली आहे. तब्बल तीन हजार कंत्राटी पदे भरली जाणार असून या साठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. सध्या मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. नवी पोलिस भरती होण्यासाठी अवधी असून तो पर्यंत ही कंत्राटी पदे भरली जाणार आहे. या साठी पोलीस आयुक्तांनी राज्यशासणाला विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील सुरक्षा व्यवस्था आणि शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मनुष्यबळाची गरज आहे. सध्या मुंबई पोलिसांनकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पुढे आले आहे. त्यात आता नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे मनुष्यबळाची ही कमतरता भरून काढण्यासाठी मुंबई पोलिस दलात कंत्राटी पोलिस भरती केली जाणार आहे. पोलिसांची भरती करण्याचा निर्णयाला गृह खात्याने मंजूरी दिली आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.
ही भरती केवळ ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळ ही भरती करणार आहे. ११ महिन्यांचा कार्यकाल संपला की त्यांना पुन्हा सुरक्षा महामंडळात पूर्वीच्या सेवेत रूजू व्हावे लागणार आहे. यासाठी १०० कोटी २१ लाख तर पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
