
डोंबिवली : केडीएमसी नगररचना विभाग त्याच्या वादग्रस्त कार्यपद्धतीने नेहमी चर्चेत असतो. नुकतेच नगररचना विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना जमीन आरेखन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अजून एका प्रकरणामुळे नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी केलेल्या तक्रारीतून बांधकामधारक मंजूर आराखड्यानुसार मार्जिन न ठेवता अतिरिक्त बांधकामे शहरात सुरू असून त्याकडील तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. तसेच या मध्ये चक्क नगररचनाकार व सहाय्यक संचालक नगररचना हे अशा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा मुख्य आरोप वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.
नेमके प्रकरण काय?
डोंबिवली पूर्वेतील न्यु आयरे रोड येथील मढवी शाळेमागील अमेय एनक्लेव्ह इमारत बांधकामाची तक्रार निंबाळकर यांनी मे २०२३ रोजी केली होती. त्यानंतर अगदी वरिष्ठ पातळीवर तक्रारी करून देखील सहाय्यक संचालक नगररचना यांनी अभय दिले असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तसेच रामनगर प्रभागातील चित्तरंजन दास रोडवरील पाम व्हियू इमारती मध्ये दोन मजले अनधिकृत उभारले असून मार्जीन न ठेवता बांधकाम केलेले आहे. याची तक्रार नोव्हेंबर २०२३ मध्ये केली असून या ही प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणात काही राजकीय बड्या हस्तींचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.
महेश निंबाळकर यांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधार सहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत असून नगररचनाकार हे बांधकामास अभय देण्यात, बिल्डरला पाठीशी घालण्यात सहकार्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. दीक्षा सावंत यांना याआधी अलिबाग येथे भ्रष्टाचार विरोधी पथकाने सापळा कारवाई केली होती. तसेच निंबाळकर हे रोज पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोध कारवाईसाठी आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाचा आज ११७० वा दिवस आहे.
