
उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. कल्याण डोबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील १४ गावांच्या संदर्भात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
या बैठकीत २७ गावे, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास, १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करणे, संत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उल्हासनगरमधील जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
- १४ गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत
- कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांना करदिलासा
वास्तविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण-डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
