भाजपातील नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना उद्देशून सुषमा अंधारे यांचं पत्र; पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण

0

महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाकडून आशा लावून बसले होते, मात्र संधी न मिळाल्याने त्यांची तीव्र नाराजी समोर येत आहे. पक्षाशी निष्ठा राखणारे हे समर्थक जाहीरपणे आपली खंत व्यक्त करताना दिसत आहेत. काही ठिकाणी कार्यकर्ते भावनाविवश होऊन धायमोकळे रडताना दिसले, तर काहींनी थेट मंचावरून नेत्यांसमोर आपली नाराजी मांडली. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज गिळण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर एका कार्यकर्त्याने निषेध म्हणून बोगस अर्जही भरल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, भाजपातील या नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना उद्देशून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांची हतबलता थेट नेत्यांपर्यंत पोहोचत नसल्याची टीका केली असून, पक्षांतर्गत संवाद तुटल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

सुषमा अंधारे यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे

प्रिय कार्यकर्ता भावांनो आणि बहिणींनो,

कसे आहात सगळे ? विशेषता निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनो, खरंतर हा प्रश्न विचारणेच व्यर्थ आहे.. कारण तुमची अस्वस्थता तुमचा आक्रोश तुमची हतबलता हे विविध वृत्तवाहिन्यांवरून आणि समाज माध्यमांवरून सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. पोहोचत नाही ते फक्त तुमच्या नेत्यांपर्यंत…!

काल संभाजीनगर मध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंत्री आज अतुल सावे आणि खासदार भागवत कराड असताना अजून एका भाजपच्या कार्यकर्तीने स्थानिक नेत्याच्या कानाखाली जाळ काढला. नाशिक मध्ये एबी फॉर्म घेऊन पळणाऱ्या आमदाराच्या मागे काही कार्यकर्ते पळताना दिसले. पुण्यामध्ये शिंदे सेनेचे लोक आक्रमक होऊन आमची तिकिटे विकली असं म्हणत एका महिला नेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला. आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाही असं जरी देवेंद्रजींनी म्हटलं असलं तरी राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा आणि सुनेला पुण्यात भाजपाने उमेदवारी दिलीच. तेही निष्ठावंत जगदीश मुळीक यांचा विरोध मोडीत काढून.. मुंबईमध्ये तर भाजपमध्ये अगदी नव्याने पाऊल ठेवलेल्या घोसाळकरांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या उपस्थितीतच इच्छुक महिलेने अत्यंत शांतपणे भाजपला धारदार प्रश्न विचारले. पण या सगळ्यांचे फलित काय.. ? खरंच या सगळ्यांना न्याय मिळणार आहे का ? कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेत्यांनी तुम्हाला झुलवत ठेवले.

छत्रपती संभाजीनगर ठाणे मुंबई नाशिक अशा महानगरांमधून हा आक्रोश का दिसत होता. महाविद्यालयीन काळामध्ये कुठेतरी वाचल्याचं आठवतंय, रात्रीच्या शांततेमध्ये रातकिडे किरकिरतात. त्याचा त्रास भयंकर होतो. पण त्याहीपेक्षा नेमका आवाज कुठून येतोय याचाच शोध लागत नाही याचा अधिक त्रास होतो..

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या काही तासांमध्ये जी धावपळ, गोंधळ, आत्मदहनाचे प्रयत्न, भाजप नेत्यांच्या मुस्काडात मारणे , एबी फॉर्म च गिळून टाकणे , पक्ष कार्यालयासमोर उपोषणाला बसणे हा सगळा त्रागा आत्मक्लेष का आणि कशासाठी.. फक्त उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही एवढं एकच कारण याच्यामागे असेल का ? नाही. एवढच कारण नाही.
दादाहो मायाहो 2024 सरत असतानाच निवडणुका आज लागतील उद्या लागतील म्हणत म्हणत कधी गणेशोत्सव.. तर कधी नवरात्री.. कधी दहीहंडी तर कधी कुठला भंडारा… कधी कुठली जयंती.. तर कधी कुठली पुण्यतिथी.. कधी हळद कुंकू.. तर कधी एखादा उरूस अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही लाखोंच्या देणग्या देत राहिलात. तब्बल दीड वर्षांपासून बॅनरबाजी मित्र मंडळ त्यांच्या पार्ट्या हे सगळं निमूटपणाने करत राहिलात. कारण तुम्हाला आशा होती, ज्या पक्षाच्या वर्षानुवर्ष सतरंज्या उचलल्या आहेत.. ज्या पक्षाचा झेंडा वागवताना तुमचा खांदा झिजला आहे. तो पक्ष तुमच्या निष्ठेला न्याय देईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू घेऊन ज्या स्वयंसेवकांनी अत्यंत निगुतीने शाखा चालवल्या.. आठवड्यातून मिळणारा सुट्टीचा एक रविवार आपल्या कुटुंबासोबत घालवण्यापेक्षा पक्ष बांधणीसाठी हसत हसत दिला.. समाजमाध्यमावर भाजप नेत्यांची प्रत्येक कृती हा कसा रणनीतीचा भाग आहे हे पटवून सांगण्यासाठी बुद्धी पणाला लावली. आपण करत असलेलं समर्थन अत्यंत लंगडं आहे.. वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.. हे कळत असताना सुद्धा आणि त्यामुळे स्वतःची अवहेलना होत आहे हे समजून सुद्धा प्रसंगी जहाल विकृत टीका टिप्पणी सहन केल्या. त्याची जाणीव कुठेतरी पक्ष नेतृत्व ठेवेल असं वाटत होतं..

पण निष्ठावंतांना न्याय द्यायला ही तत्त्वनिष्ठ भाजपा कुठे आहे? अटलजी गेले. महाराष्ट्रात प्रमोद महाजन–गोपीनाथ मुंडे गेले आणि पाठोपाठ तत्वनिष्ठ भाजपही संपली. आता जी भाजपा उरली आहे; ती सत्तेच्या प्रचंड महत्वकांक्षा बाळगून प्रसंगी ज्यांच्या अंगा खांद्यावर पक्ष वाढला त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवत निष्ठावंतांना चिरडून टाकणारी भाजपा उरलीय.

आमदार देवयानी फरांदे यांच्या डोळ्यातलं पाणी , सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला शनिशिंगणापूरचा उल्लेख, नितीन गडकरींनी आपल्याच नेत्यांचे उपटलेले कान हे सगळं एका दिवसात एका तासात नाही घडलं…

खरंतर सर्व प्रकारच्या स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून साम–दाम–दंड–भेद निती अवलंबून केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली. सत्तेचा कळस रचला. कळसावर सर्व प्रकारच्या संविधानिक स्वायत्त यंत्रणांच्या मुडदा पाडून हुकूमशाहीचा झेंडा रोवला. तरीसुद्धा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता मिळवणारा विश्वव्यापी भारतीय जनता पक्ष आपल्याच कार्यकर्त्यांना आनंदी आणि समाधानी का ठेवू शकत नाही ?
तर त्याचं साधं उत्तर आहे. सत्ता मिळाली तरी सत्ता पचवता आली पाहिजे. पराभव पचवणं जितका कठीण आहे; तितकंच कठीण आहे मिळालेलं यश पचवणं…!!
भाजपला मिळालेलं यश पचवता येत नाहीय
दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेचा कळस गाठल्यानंतर आणि कळसावर एकाधिकारशाहीचा झेंडा लावल्यानंतरही आपली सगळी शक्ती ज्या कार्यकर्त्यांमुळे ही सत्ता मिळाली त्यांच्यामध्ये वितरित करून त्यांना समाधानी ठेवण्यासाठी, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी आणि राजकीय उन्नतीसाठी वापरण्यापेक्षा विरोधकांना वाकोल्या दाखवण्यासाठी आणि अजस्त्र पाशवी सत्तेचा माज दाखवण्यासाठी वापरली जात आहे.

अजस्त्र पाशवी बहुमत मिळालं तरी सुद्धा विरोधक शिल्लक ठेवायचा नाही या असुरी सत्ताकांक्षेने पछाडलेले देवेंद्र फडणवीस आणि शीर्ष भाजप नेतृत्व यांनी विरोधकांवर सूड उगवण्यासाठी ईडी सीबीआय पोलिसी कारवाया यांचा धाक दाखवत एक एक भ्रष्टाचारी बलात्कारी गुन्हेगार गुंड तडीपार यांना प्रवेश देण्याचा सपाटा चालू केला. पण एवढे लोक घरात घेतल्यावर मुळात त्यांना राहण्याची जागा कशी करून देणार..?
नवीन आलेल्या लोकांना जागा करून देण्यासाठी मग ज्यांनी चिखल माती गाळ उपसून घर बांधलं होतं त्यांनाच घरातून निर्वासित करण्याचा अत्यंत क्रूर मार्ग अवलंबिला गेला.
दादा हो, तुम्ही कधी वारूळ बघितलं का ? वारूळ मुंग्या बांधतात. पण एकदा का वारूळ पूर्ण झालं की त्यात राहण्याचं भाग्य मात्र मुंग्यांना लाभत नाही. वारुळात विषारी नाग राहायला येतात…!
भाजपचं सुद्धा तेच झालंय..!

आम्ही काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करू अशी गर्जना करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे राजकीय लाभार्थी या सगळ्यांनी मिळून निष्ठावंतांचा घात काढला. ज्या जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी आणि संघाच्या मुशीतून आलेल्या स्वयंसेवकांनी भाजपच्या सत्तेचं वारूळ बांधलं. मात्र त्या वारुळातून या जुन्या निष्ठावंतांना निष्कासित करून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असे सगळीकडून तडीपार गुंड गुन्हेगार बलात्कारी भ्रष्टाचारी अरबोखरबोंची माया जमा केलेले सत्तांध स्वार्थी विषारी नाग आता वारुळात राहायला आले.. यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली..

दादाहो, तुम्ही ज्यांना पक्ष नाही “मोदी का परिवार” मानत आलात त्यांच्यासाठी तुम्ही परिवारातील सदस्य नाही तर सत्तेसाठी लागणाऱ्या शिडीतील फक्त एक पायरी आहात..!रातकिड्यांच्या किरकीरण्याचा आवाज नेमका कुठून येतोय तर .. तो इथून.. !!नव्यांना घरात जागा देण्यासाठी जुन्यांना बेघर करत रस्त्यावर आणलंय..

असो, तुम्ही सगळे लढाऊ आहात झुंजार आहात. अजून खूप लढाया लढायच्या आहेत. पण आता इतरांसाठी लढण्यापेक्षा चला कुटुंबाकडे लक्ष देऊया. लक्षात ठेवा. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. सत्तेचा अमर पट्टा घेऊन कुणीही आलेला नाही. ज्यांनी आज तुम्हाला सत्तेचा रुबाब दाखवला आहे तेही कधी ना कधी या सत्तेतून पायउतार होणारच आहेत.. !
कारण,
” याद रख सिकंदर के हौंसले तो आली थे,
जब मरा सिकंदर तो उसके दोनों हाथ खाली थे..! ”
कळावे
आपली बहीण
_ सुषमा अंधारे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)