राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधुंची युती झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीचीही घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेवरील सत्ता अबाधित राखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार महापालिका निवडणुकीत युती करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मुंबईसाठी ठाकरे बंधू तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचे दिसत आहेत. ठाकरे बंधुंच्या युतीनंतर आता दोन्ही राष्ट्रवादीची २६ डिसेंबरला युतीची घोषणा होणार असल्याची माहिती स्वत: अजित पवारांनी (Ajit pawar) दिली.