BMC नोकरीच्या आमिषाने ७ लाख ५० हजारांची फसवणूक; डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार, सखोल चौकशीची मागणी

0




 डोंबिवली | प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चार युवकांकडून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत प्रदीप देवेंद्र सावंत (भाजपा सरचिटणीस, कल्याण ग्रामीण मंडळ १) यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारीनुसार, कुणाल राजाराम जाधव याने बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत चार युवकांकडून एकूण ₹७.५० लाख घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील युवकांमध्ये जतिन मनोहर केतकर, ऋतिक महेंद्र आदुळकर, विठ्ठल उदय धुरी आणि हर्षल आशुतोष चोपडेकर यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित युवकांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे स्वीकारल्यानंतर, व्यवहाराचे स्वरूप बदलण्यासाठी स्टॅम्प पेपरवर “पैसे उसने घेतले असून काही महिन्यांत परत करतो” असा करार करून घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर संबंधित चार युवकांना ₹७.२५ लाखांची रक्कम परत मिळवून देण्यात आल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले. मात्र, नोकरीच्या आमिषाने पैसे स्वीकारल्याच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी होऊन संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीच्या नावाने बृहन्मुंबई महानगरपालिकेची असल्याचे सांगितली जाणारी तीन ओळखपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध असून, त्या ओळखपत्रांची सत्यता आणि संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत होती किंवा आहे का, याची अधिकृत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये स्वतःला “साळसकर” असे संबोधणाऱ्या एका व्यक्तीकडून फोनवर धमक्या मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत “₹२५ लाखांची खंडणी मागितल्याचा” खोटा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. या आरोपांचा कोणताही आधार नसल्याचे तक्रारदाराने म्हटले असून, या व्यक्तीची खरी ओळख आणि तो प्रत्यक्षात पोलीस अधिकारी आहे की नाही, याची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, संबंधित आरोपींची बँक खाती, आर्थिक व्यवहार, UPI व्यवहार, डिजिटल पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, CDR तसेच उपलब्ध कागदपत्रांची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास कायद्यानुसार संबंधित बँक खाती गोठविण्याची (फ्रीज) कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारदाराने असेही नमूद केले आहे की, २०२१ मध्ये अशाच स्वरूपाच्या कथित नोकरी फसवणूक प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्या प्रकरणाचा आणि सद्य प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील कायदेशीर पाठपुरावा सुरू राहणार असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप सावंत यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची भूमिका अद्याप समोर आलेली नसून, तक्रारीवरील पोलीस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)