गांधीनगरमधील धर्मवीर आनंद दिघे ओपन जिम अनेक वर्षांपासून बंद; मनसेकडून तात्काळ दुरुस्ती व पुन्हा सुरू करण्याची मागणी

0

डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर परिसरात धर्मवीर आनंद दिघे सभागृहाच्या बाजूला असलेल्या भूखंडावर महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली धर्मवीर आनंद दिघे ओपन जिम गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ही महापालिकेची पहिली ओपन जिम असून नागरिकांमध्ये ती ‘ग्रीन जिम’ म्हणून ओळखली जात होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज ही सुविधा पूर्णपणे निष्क्रिय झाली आहे.

ओपन जिमच्या मुख्य प्रवेशद्वारावरील धर्मवीर आनंद दिघे यांचा नामफलक गंजलेला असून आतील व्यायामाची उपकरणे वापराअभावी खराब स्थितीत पडून आहेत. परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांना नियमित व्यायामासाठी उपयुक्त ठरणारी ही जिम बंद असल्यामुळे आरोग्यविषयक सुविधेपासून नागरिक वंचित राहिले आहेत.

या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओपन जिम तात्काळ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे. मनसेच्या वतीने समीर भोर यांनी याबाबत महापालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. भोर हे प्रभाग क्रमांक २८ (ड) मधून महापालिका निवडणूक लढवित असताना आपल्या वचननाम्यातही या ओपन जिमच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख केला होता.

महापालिकेने तातडीने कारवाई न केल्यास पुढील काळात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)