
विरार : विरारमध्ये एक दुदैवी घटना समोर आली आहे. एका १९ मजली हायप्रोफाईल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आपल्या एकुलत्या एक चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र मुलीच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्याने सावरत तिच्या आईवडिलांनी समाजाला आदर्श घालून देणारा धाडसी निर्णय घेतला आहे. चिमुकलीच्या कुटूंबीयांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.
दर्शनी सुरेश शालियान (वय ४ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आज (मंगळवार) सकाळी ही दुदैवी घटना घडली आहे. विरार पश्चिमेच्या बचराज या १९ मजली हाय प्रोफाइल इमारतीत ही घटना घडली. सुरेश शालियान मुंबईत कामाला होते. ते या इमारातीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होते.
सुरेश शालियान दररोज लोकलने मुंबईत कामाला जात होते. नेहमीप्रमाणे आद दर्शनीची आई मुलगी झोपेत असल्याने तिला घरी सोडून पतीला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेली होती. दरम्यान मुलगी झोपेतून उठल्यावर ती घरात आईला सर्वत्र शोधू लागली. आई घरात कुठेच दिसत नसल्याने तिने बेडरूममधील बेडवर चडून खिडकीत उभी राहिली. ची खिडकीतून इमारतीच्या खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी तिचा तोल गेल्याने ती चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
बेडरूमच्या खिडक्यांना सुरक्षेसाठी लोखंडी ग्रील नसल्याने चिमुकलीचा नाहक बळी गेला आहे. बिल्डरने १९ मजली इमारत बांधली मात्र खिडक्यांनी ग्रील बसवले नाही, त्याचबरोबर फ्लॅटच्या मालकांनीही त्या बसवल्या नव्हत्या. मात्र आईवडिलांचा बेजबाबदारपणाही अशा अपघातांना कारणीभूत ठरतो. जर आई वडिलांनी चिमुरडीला घरी एकटं सोडलं नसतं तरी चिमुरडीचा जीव वाचला असता.
